मानवी शरीर पंचमहाभूतांनी घडलेले असले, तरी त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला दिशा देणारे एक अदृश्य तत्त्व त्याच्या अंतरी वास करत असते, ते म्हणजे मन. सर्वश्रुत असल्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांप्रमाणे मनाला आकार नाही, रंग नाही, स्पर्श नाही. तथापि प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक कृतीमागे मनाचेच अस्तित्व कार्यरत असते. म्हणूनच मन दिसत नसले, तरी त्याचे परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षणी अनुभवास येतात.
कल्पना, भावना, स्मृती, विवेक आणि जाणीव यांची जी एकत्रित अनुभूती निर्माण होते, तिला मन म्हणता येईल. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत मेंदूमधील अब्जावधी चेतापेशी आणि त्यांच्यातील विविध रासायनिक प्रक्रियांतून निर्माण होणाऱ्या चेतनेचा अनुभव म्हणजे मन; तर भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने मन हे मानवाच्या बंधनाचे आणि मुक्तीचे मूळ कारण मानले गेले आहे.
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥
अर्थात विषयांमध्ये आसक्त झालेले मन मनुष्याला बंधनात अडकवते, तर विषयांच्या मोहातून अलिप्त झालेले मन मुक्तीकडे घेऊन जाते.
मनाचे स्वरूप अत्यंत चपळ आहे. क्षणभरापूर्वी एखाद्या आनंददायी स्मृतीत हरवलेले मन पुढच्याच क्षणी काळजीच्या सावटाखाली येते. कधी ते भूतकाळात रमत असते, तर कधी भविष्याच्या चिंतेने अस्वस्थ होत असते. वर्तमानात स्थिर राहणे ही मनासाठी सर्वांत कठीण गोष्ट असते. म्हणूनच संत, तत्त्वज्ञ आणि ऋषिमुनी यांनी मनाला समजून घेण्याचा आणि त्याला योग्य दिशा देण्याचा अखंड प्रयत्न केला.
भारतीय संतपरंपरेमध्ये मनाला विशेष स्थान आहे. समर्थ रामदासस्वामींनी तर थेट मनालाच संबोधित करत मनाचे श्लोक रचले. हे श्लोक केवळ धार्मिक उपदेश नाहीत; ते मनाला घडविणारे आणि अंतर्मुख करणारे जीवनशास्त्र आहे. समर्थ म्हणतात,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥
या एका ओवीत समर्थांनी मनाच्या प्रवासाची दिशा निश्चित करून दिली आहे. सज्जनता, भक्ती, विवेक आणि आत्मशुद्धी यांच्या मार्गाने चालणारे मन क्रमाक्रमाने स्थैर्याकडे वाटचाल करू लागते. कारण मनाला जबरदस्तीने जिंकता येत नाही; त्याला समजावून, संस्कारित करून आणि योग्य दिशेने वळवूनच जिंकावे लागते.
याच ठिकाणी संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. मन आणि संगीत हे प्रत्यक्षात दोन वेगळे विषय नसून एकाच अनुभूतीची दोन रूपे आहेत. मनाला जे शब्दांनी समजत नाही, ते अनेकदा स्वरांनी समजते. विचार जिथे थांबतात, तिथून नादाचा प्रवास सुरू होतो. नादाधीनम जगत सर्वम म्हणूनच संगीत ही केवळ कला नाही; ती मनाला स्पर्श करणारी, त्याला आकार देणारी आणि त्याचे शोधन करणारी साधना आहे.
एखादा राग शांतपणे कानावर पडतो, एखादा अभंग अंतःकरणात झंकारून जातो किंवा भजनाचा स्वर वातावरणात घुमू लागतो, तेव्हा मन आपसूकच बाह्य गोंगाटापासून दूर सरकू लागते. असंख्य विचारांनी भरकटणारे चित्त लय आणि स्वरांच्या अधीन होत जाते. संगीत माणसाला काही क्षण स्वतःकडे परत आणते. म्हणूनच संगीत ऐकल्यावर प्रसन्नता, शांती किंवा समाधानाची अनुभूती मिळते.
विज्ञान सांगते की संगीत ऐकताना मेंदूमध्ये आनंदाशी संबंधित रसायनांची निर्मिती होते. परंतु संतपरंपरा त्यापुढील एक अनुभव सांगते. त्यांच्या दृष्टीने संगीत हे मन शांत करण्याचे नव्हे, तर मन शुद्ध करण्याचे साधन आहे. म्हणूनच वारकरी परंपरेत अभंग आहेत, भक्तिपरंपरेत भजन आहे आणि साधनेत नामस्मरण आहे.
संगीताचा खरा परिणाम स्वरांमध्ये नसतोच मुळी; तो त्या स्वरांनी घडविलेल्या मनामध्ये असतो.
रियाज करणारा साधक जेव्हा एखादा स्वर पुन्हा पुन्हा साधतो, तेव्हा तो केवळ गाणे शिकत नसतो. तो संयम शिकत असतो. तो प्रतीक्षा शिकत असतो. तो स्वतःच्या अस्थिर मनाला एका केंद्रावर स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. एका शुद्ध स्वरासाठी लागणारे लक्ष, सातत्य आणि समर्पण हीच गुणवैशिष्ट्ये मनशुद्धीची देखील असतात. म्हणून संगीताची साधना ही प्रत्यक्षात मनाचीच साधना असते.
कदाचित याच कारणास्तव संतवाङ्मयात नादाला ब्रह्माचे स्वरूप मानले गेले आहे. स्वरांच्या मागे धावताना साधक नकळत स्वतःच्या मनाचा शोध घेऊ लागतो. त्याला जाणवते की बाह्य जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनावर विजय मिळविणे अधिक महत्त्वाचे आहे.
मनुष्याच्या जीवनातील बहुतांश संघर्ष बाह्य परिस्थितींशी नसतात; ते स्वतःच्या मनाशी असतात. राग, लोभ, मत्सर, अहंकार, भीती आणि असंतोष हे सर्व मनाचेच तर खेळ असतात. समर्थ रामदासांनी या अंतर्गत शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी मनाला विवेक, भक्ती आणि सदाचार यांची साथ दिली. संगीत त्या प्रवासात शांत प्रकाशासारखे कार्य करते. ते मनाला नाकारत नाही, दाबत नाही; तर हळूहळू त्याचे शोधन करते.
जसे वाहणारे पाणी शेवटी समुद्रात विलीन होऊन स्थिर होते, तसेच विचारांच्या हजारो लाटा अखेरीस नादाच्या सागरात शांत होतात. तेव्हा मनाचा कोलाहल विरतो आणि अंतर्मनात एक निःशब्द प्रसन्नता जन्म घेते. हीच प्रसन्नता साधकाला स्वतःची ओळख करून देते.
संतांच्या नामभक्तीचा, समर्थांच्या मनोविज्ञानाचा आणि संगीतसाधनेच्या अनुभवाचा सार एवढाच की मनाला जिंकण्याचा मार्ग मनाला दाबण्यात नसतो; तर त्याला भक्ती, विवेक, नाम आणि स्वर यांच्या साहाय्याने स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे नेण्यात असतो. जेव्हा मन भक्तीच्या ओलाव्यात, नामाच्या माधुर्यात, संतांच्या सहवासात आणि स्वरांच्या पावित्र्यात न्हाऊन निघते, तेव्हा जीवनाला केवळ यश नव्हे तर अर्थ प्राप्त होतो. अशा वेळी संगीत ऐकले जात नाही, ते जगले जाते; आणि मन समजले जात नाही, ते अनुभवले जाते.
अरे मना दुर्विचारांसी सोड,
भक्ती भावाची सांगड धरुनी, नामस्मरणी जोड ॥
व्यर्थ मनाशी बडबडोनी,
कल्पनेचे इमले बांधुनी, नुसता जीवासी फोड ।
सत्कारणी हा वेळ दवडुनी, कपटाचरणा सोड ॥
दैनंदिन व्यवहारातुनी,
समाधानाचे सुख भोगुनी, लोभमोहासी तोड ।
संत संगतीचा लाभ घेउनी, विषयवासना सोड ॥
क्षणभंगुर या जीवनातूनी,
मोहजाळात न गुंतुनी, भावना ठेवी गोड ।
रेणुकादासा आता लागली, कांताचरणी ओढ ॥
– सदगुरुचरणाश्रित रेणुकादास ✍
(श्री. रोहन नारायणराव गावडे, दिनांक ०२/११/२०२६)
Comments (2)
P Prof. Rahul G. Aghade
अत्यंत चिंतनशील, प्रगल्भ आणि अंतर्मुख करणारा लेख! मनाचे स्वरूप, त्याची चंचलता, संतविचारांची आध्यात्मिक बैठक आणि संगीतसाधनेचे मनःशुद्धीतील अनन्यसाधारण महत्त्व आपण अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखविले आहे. विशेषतः ‘संगीताचा खरा परिणाम स्वरांमध्ये नसतोच मुळी; तो त्या स्वरांनी घडविलेल्या मनामध्ये असतो’ हा विचार मनाला विलक्षण भावला. भारतीय संतपरंपरेतील तत्त्वज्ञान आणि संगीतसाधनेचा सुरेख समन्वय साधत आपण वाचकाला केवळ विचारप्रवृत्त केले नाही, तर आत्मचिंतनाची दिशाही दिली आहे. आपल्या लेखणीतून असेच वैचारिक, आध्यात्मिक आणि मनसमृद्ध करणारे साहित्य सातत्याने उपलब्ध होत राहो, ही मनःपूर्वक सदिच्छा..!
M Mr. Rohan Gawade
सखा कृपावंत वाचा त्याची ।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी ।
शिकविता धनी वेगळाची ।।
काय म्यां पामरें बोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभर बोलविले ।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
वागवी पांगुळा पायाविण ।।
Log in or join to comment