आज संगीत क्षेत्रात वावरत असताना आणि विविध तरुण साधकांशी, विद्यार्थ्यांशी हितगूज साधत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे – प्रत्येकाला अगदी कमी कालावधीत किंवा झटपट ही कला आत्मसात करायची आहे. आजचे युग ‘इन्स्टंट’ आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर मिळवण्याची सवय लागलेली नवीन पिढी संगीतासारख्या अथांग कलेलाही ‘शॉर्टकट’ लावू पाहत आहे.
दैवदत्त देणगी आणि प्रत्यक्ष वास्तव
काही भाग्यवान कलासाधकांना जन्मजात किंवा दैवदत्त देणगी लाभलेली असते. त्यामुळे त्यांना ही कला इतरांपेक्षा लवकर साध्य होतेही. परंतु, प्रत्येक व्यक्तीची ग्रहणक्षमता आणि गती वेगळी असते. व्यक्तीपरत्वे या कलेच्या विकासासाठी वेगवेगळा वेळ लागतो, हे आपण समजून घेतले पाहिजे.
आपण जर आपल्या देशातील विविध मान्यवर आणि दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचे (Performances) बारकाईने निरीक्षण केले, तर एक गोष्ट प्रत्यक्ष लक्षात येईल – वाढत्या वयाच्या अनुभवानुसार त्यांच्या सादरीकरणामध्ये अमूलाग्र बदल होत जातो. तरुण वयातील वेग आणि तांत्रिक अचूकता ही उतारवयात एका अद्भूत परिपक्वतेमध्ये आणि शांततेत बदलते. ज्येष्ठ कलाकारांच्या केवळ एका स्वरातील ‘मींड’ किंवा ‘कण’ श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. हा बदल केवळ तांत्रिक सरावाने येत नाही, तर तो आयुष्यभराच्या चिंतनातून येतो.
संगीत: एका रात्रीत शिकता न येणारी कला
याचाच अर्थ असा की, संगीत ही सहज शक्य होणारी कला नाही. एका रात्रीत किंवा काही महिन्यांच्या कोर्समध्ये ती आत्मसात करता येत नाही. संगीतात प्राविण्य मिळवण्यासाठी:
- तीव्र साधना आणि नियमित रियाज: केवळ काही तास गाणे किंवा वाजवणे म्हणजे साधना नव्हे, तर स्वरांशी एकरूप होणे आवश्यक असते.
- अचूक स्वर-लयीची समज: कान तयार होण्यासाठी आणि लयीची नाडी सापडण्यासाठी अनेक वर्षे द्यावी लागतात.
- दीर्घकालीन संयम: संगीत केवळ पाठांतराने किंवा पोपटासारखे गाण्याने येत नाही. त्यासाठी समर्पित सातत्य लागते.
- गुरूंचे मार्गदर्शन: संगीतात ‘काय गावे’ यापेक्षा ‘काय गाऊ नये’ आणि ‘स्वर कसा लावावा’, हे समजण्यासाठी उत्तम गुरूंच्या छत्राखाली राहणे अनिवार्य आहे.
सोशल मीडियाचा प्रभाव आणि ‘पाण्याचा फवारा’
आजकालच्या बहुतांश साधकांना आणि विशेषतः त्यांच्या पालकांना मात्र एवढा वेळ संगीतासाठी देणे निरर्थक किंवा वेळेचा अपव्यय वाटू लागला आहे. सोशल मीडियावरील १५ ते ३० सेकंदांच्या रिल्स (Reels) आणि व्हिडिओजच्या ‘इन्फ्लुएन्स’मुळे (Influence) क्षणिक प्रसिद्धी मिळवणे सोपे झाले आहे.
याचा परिणाम असा होतो की, काही तरी विलक्षण क्षमता असणारी बहुतांश तरुण साधक मंडळी पाण्याच्या फवाऱ्यासारखी जोरात वर येतात, प्रकाशझोतात चमकतात आणि तितक्याच वेगाने काळाच्या ओघात उडूनही जातात.
मूळ आनंद हरवतोय का?
या साऱ्या झटपट प्रसिद्धीच्या आणि व्यावसायिकतेच्या चक्रात संगीतातून मिळणारा मूळ आनंद कमी होत चालला आहे. संगीत हे ‘स्वान्तसुखाय’ – म्हणजेच स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी आणि श्रोत्यांना परमानंद देण्यासाठी असते. परंतु, आज ते केवळ स्पर्धा, लाईक्स आणि व्ह्यूजपुरते मर्यादित झाल्यासारखे वाटते. सोशल मीडिया हे केवळ एक उत्तम माध्यम आहे, ते साध्य (Goal) नव्हे. जर नवोदित साधकांनी रोजच्या रियाजाचे सातत्य आणि गुरूंची शिकवण पाळली, आणि सोबतीला या माध्यमाचा योग्य वापर केला, तर त्यांचे संगीत काळाच्या ओघात नक्कीच अमर होईल.
शेवटी…
संगीताचा हा प्रवास म्हणजे ‘१०० मीटरची शर्यत’ नसून, ती एक ‘मॅरेथॉन’ आहे. जितके तुम्ही थांबाल, जिरेल तितके ते अधिक समृद्ध होत जाईल. नवीन पिढीने आणि पालकांनी या कलेचे गांभीर्य ओळखून शॉर्टकटऐवजी ‘साधनेचा’ मार्ग निवडला, तरच संगीताचे मूळ सौंदर्य टिकून राहील. अन्यथा पाण्याच्या फवाऱ्यासारखी क्षणिक चमक अनुभवायची की अक्षय सुरांचा महासागर व्हायचं, याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. म्हणूनच आजच्या या बदलत्या गणितांकडे पाहता, खरोखरच यावर गांभीर्याने चिंतनाची गरज आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक संगीतप्रेमीने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
Comments (1)
A aghaderahul
अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आणि मौलिक शब्दात वास्तव मांडले आहे. धन्यवाद..!
Log in or join to comment