भारतीय संगीतातील भक्ती परंपरेत काही संत असे आहेत की ज्यांचे मोठेपण त्यांच्या रचनांपेक्षा त्यांच्या जीवनदृष्टीत अधिक दिसून येते. अष्टछाप परंपरेतील ज्येष्ठ कृष्णभक्त संत कुंभनदास हे अशाच संतांपैकी एक होते. त्यांचे जीवन हे भक्ती, निस्पृहता, श्रमप्रतिष्ठा, कलात्मक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक स्वाभिमान या मूल्यांचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला की हे प्रकर्षाने जाणवते. त्यांनी कोणतेही तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने मांडले नाही; परंतु त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती हीच जणू एक जिवंत शिकवण बनली.
आज प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या मोहात अडकलेल्या काळात कुंभनदासांचे जीवन नव्याने वाचण्याची गरज वाटते. कारण त्यांनी आपल्या आचरणातून एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला होता – कलाकाराचा खरा स्वामी कोण? सत्ता, प्रतिष्ठा आणि वैभव की अंतःकरणातील सत्य?
भक्ती परंपरेचीची पार्श्वभूमी
पंधरावे आणि सोळावे शतक हे भारतीय सांस्कृतिक इतिहासातील भक्ती परंपरेचे सुवर्णयुग मानले जाते. उत्तर भारतात कबीर, सूरदास, मीराबाई, स्वामी हरिदास, वल्लभाचार्य अशा संतांनी धर्माला कर्मकांडांच्या चौकटीतून मुक्त करून लोकांच्या भावविश्वाशी जोडले. या काळात ब्रजभूमीत कृष्णभक्तीच्या अनेक परंपरा विकसित होत होत्या.
याच वातावरणात महाप्रभू वल्लभाचार्यांनी पुष्टिमार्गाची स्थापना केली. भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेम, सेवा आणि समर्पण यांवर आधारित या परंपरेत संगीताला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. श्रीनाथजींच्या सेवेसाठी नियुक्त केलेल्या आठ प्रमुख कवी-गायकांचा समूह “अष्टछाप” म्हणून ओळखला जातो. सूरदास, नंददास, परमानंददास, कृष्णदास, गोविंदस्वामी, चतुर्भुजदास, छीतस्वामी आणि कुंभनदास या आठ कवी-गायकांनी या परंपरेला समृद्ध केले.
संत नव्हे, आधी शेतकरी
मथुरेजवळील गोवर्धन परिसरातील जमुनावतो या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात कुंभनदासांचा जन्म झाला. वल्लभाचार्यांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी श्रीनाथजींच्या सेवेला स्वतःला समर्पित केले. परंतु त्यांचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्मिक कीर्ती मिळाल्यानंतरही त्यांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय सोडला नाही.
आज आपण यश मिळाले की मूळ जीवनशैली बदलतो. कुंभनदासांनी त्याउलट जीवन जगले. त्यांच्या दृष्टीने शेती हा उपजीविकेचा मार्ग होता, तर भक्ती हा जीवनाचा श्वास होता. श्रमातून मिळालेल्या भाकरीत त्यांना जे समाधान मिळत होते, ते कोणत्याही राजाश्रयात मिळू शकले नसते.
कुंभनदासांच्या या जीवनातून एक महत्त्वाचे तत्त्व समोर येते – भक्ती म्हणजे जगापासून पलायन नव्हे; तर जगात राहूनही मोहापासून मुक्त राहणे.
हवेली संगीताचा आत्मा
कुंभनदासांचे नाव घेतले की हवेली संगीताचा इतिहासही समजून घ्यावा लागतो. गोवर्धनावरील श्रीनाथजी मंदिरात दिवसातील विविध प्रहरांनुसार कीर्तन करण्याची परंपरा होती. प्रत्येक वेळी वेगळे भाव, वेगळे राग आणि वेगळ्या प्रकारची पदरचना वापरली जाई. या परंपरेत संगीत हे करमणुकीचे साधन नव्हते; ते सेवा होते.
म्हणूनच कुंभनदासांचा स्वर श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी होता. त्यांच्या पदांमध्ये ब्रजभाषेची सहजता, भक्तिभावाची आर्तता आणि रागसंगीताची अभिजातता एकत्रित दिसून येते. भारतीय संगीताच्या इतिहासात त्यांनी “स्वर साधना”ला “भक्ती साधना”चे रूप दिले.
विशेष म्हणजे, कुंभनदास हे केवळ कवी नव्हते, तर पुष्टिमार्गीय हवेली संगीत परंपरेच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कीर्तनकार होते. त्यांच्या पदांची रचना विशिष्ट राग, ऋतू आणि श्रीनाथजींच्या सेवाविधीशी निगडित होती. त्यामुळे त्यांचे साहित्य केवळ भक्तिकाव्य नसून भारतीय संगीतपरंपरेचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज मानला जातो.
अकबराचा दरबार आणि संताचा स्वाभिमान
कुंभनदासांच्या जीवनातील सर्वाधिक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे फतेहपूर सीकरीचा. त्यांच्या कीर्तनकलेची कीर्ती सम्राट अकबरापर्यंत पोहोचली. त्या काळातील भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजाच्या दरबारातून निमंत्रण येणे म्हणजे कलाकारासाठी सर्वोच्च सन्मान मानला जात असे. अनेक कलाकार राजाश्रय मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करीत असत.
परंतु कुंभनदासांना सत्तेच्या वैभवाची कोणतीही भुरळ पडली नाही. ते दरबारात गेले; पण तेथील वैभव, दरबारी शिष्टाचार आणि औपचारिक सन्मान अनुभवताना त्यांच्या मनात एकच विचार घोंगावत राहिला – “मी येथे का आहे? माझे स्थान तर श्रीनाथजींच्या चरणी आहे.”
दरबारातून परतल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातून उमटलेले पद भारतीय भक्तिसाहित्यात अमर झाले :
संतन को कहा सीकरी सों काम?
आवत जात पनहियाँ टूटी, बिसरि गयो हरि नाम।
जिनको मुख देखे दुख उपजत, तिनको करिबे परी सलाम।
कुंभनदास लाल गिरिधर बिनु और सबै बेकाम।।
या पदाचा आशय अत्यंत गहन आहे. संताला सत्तेच्या दरबारात जाऊन काय करायचे? त्या येण्या-जाण्यात पादत्राणे झिजली आणि सर्वांत मोठी हानी म्हणजे हरीनामाचे स्मरण हरपले. ज्यांना प्रणाम करण्याची अंतःकरणातून इच्छा नाही, त्यांनाही पदामुळे सलाम करावा लागतो. म्हणून गिरिधर कृष्णाशिवाय बाकी सर्व काही व्यर्थ आहे.
तानसेन आणि कुंभनदास : दोन सांगीतिक दृष्टिकोन
सोळाव्या शतकातील भारतीय संगीतसमृद्धीचा विचार केला तर दोन व्यक्तिमत्त्वे विशेषत्वाने समोर येतात – मियाँ तानसेन आणि संत कुंभनदास. दोघेही महान होते; परंतु त्यांची साधना वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करीत होती.
| मियाँ तानसेन | संत कुंभनदास |
| राजदरबाराचे प्रतिनिधी | देवदरबाराचे प्रतिनिधी |
| राजाश्रय | ईश्वराश्रय |
| वैभवशाली दरबारी संगीत | हवेली व भक्ती संगीत |
| सम्राटाच्या सेवेसाठी गायन | श्रीनाथजींच्या सेवेसाठी गायन |
| कलात्मक उत्कृष्टतेचा आदर्श | आत्मिक समर्पणाचा आदर्श |
लोकपरंपरेतील एका प्रसिद्ध कथेनुसार अकबराने तानसेन यांना विचारले की त्यांच्या गुरू स्वामी हरिदास यांचे गायन अधिक प्रभावी का वाटते. त्यावर तानसेन म्हणाले होते, “मी पृथ्वीच्या बादशहासाठी गातो; माझे गुरू विश्वाच्या अधिपतीसाठी गातात.”
या कथनाची ऐतिहासिक सत्यता हा अभ्यासाचा विषय असला, तरी त्यामागचे तत्त्वज्ञान निर्विवाद आहे. कुंभनदासांचे संपूर्ण जीवन जणू या विचाराचेच मूर्तिमंत उदाहरण वाटते. ज्याची साधना परमेश्वरासाठी असते, त्याला बाह्य सन्मानांचे आकर्षण उरत नाही.
कुंभनदासांचा आधुनिक संदर्भ
कुंभनदासांचा प्रश्न केवळ सोळाव्या शतकासाठी नव्हता. तो आजही तितकाच जिवंत आहे. आज कलाकार प्रसिद्धीसाठी झटतो. शिक्षक पदोन्नतीसाठी धडपडतो. संशोधक मानांकनासाठी प्रयत्न करतो. लेखक पुरस्कारांच्या प्रतीक्षेत असतो. या सर्व धडपडीत एक प्रश्न मात्र मागे पडतो – या प्रवासात आपण स्वतःला हरवत तर नाही ना?
कुंभनदासांचा संदेश असा नाही की यश, सन्मान किंवा प्रतिष्ठा वाईट आहे. त्यांचा संदेश एवढाच आहे की, यशाच्या शोधात आपले मूळ ध्येय हरवू नये. बाह्य सन्मान प्राप्त करणे चुकीचे नाही; परंतु त्या बदल्यात अंतःकरणाची स्वायत्तता गमावणे हे निश्चितच चुकीचे आहे.
म्हणूनच त्यांचे जीवन संगीतकारांसाठीच नव्हे, तर शिक्षक, संशोधक, लेखक, प्रशासक आणि समाजनेते यांच्यासाठीही प्रेरणादायी ठरते.
निष्कर्ष : “सीकरी” प्रत्येकाच्या जीवनात आहे
कुंभनदासांच्या जीवनाकडे केवळ संतचरित्र म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ते भारतीय सांस्कृतिक परंपरेतील एका महान मूल्यदृष्टिकोनाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी कला आणि सत्ता, साधना आणि प्रसिद्धी, भक्ती आणि वैभव यांमधील नाते नव्याने समजावून सांगितले.
आज प्रत्येकाच्या जीवनात एखादी “सीकरी” आहे. ती कधी पदाची असते, कधी पैशाची, कधी प्रसिद्धीची, तर कधी अहंकाराची. प्रश्न सीकरीचा नाही; प्रश्न एवढाच आहे की त्या मोहाच्या प्रवासात आपण आपल्या “हरीनामाला” विसरतो का?
कुंभनदासांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की, संतत्व हे चमत्कारांत नसते; ते निवडीमध्ये असते. जेव्हा माणूस सत्तेपेक्षा सत्य, कीर्तीपेक्षा कर्तव्य आणि वैभवापेक्षा मूल्य यांची निवड करतो, तेव्हा त्याच्या जीवनात भक्ती जन्म घेते.
कुंभनदासांचे संपूर्ण जीवन याच प्रश्नाचे उत्तर आहे. त्यांनी राजदरबार पाहिला, पण त्याला नाकारले. त्यांनी कीर्ती मिळवली, पण तिला कवटाळले नाही. त्यांनी स्वर साधले, पण ते स्वतःसाठी नव्हे तर श्रीनाथजींसाठी अर्पण केले.
म्हणूनच त्यांच्या एका ओळीत संपूर्ण जीवनदर्शन सामावलेले आहे :
“कुंभनदास लाल गिरिधर बिनु और सबै बेकाम.”
याच वाक्यात संत कुंभनदासांच्या भक्तीचे, कलेचे आणि जीवनाचे चिरंतन तत्त्वज्ञान दडलेले आहे.
श्री. रोहन नारायणराव गावडे,
छत्रपती संभाजीनगर
Comments (0)
No comments yet.
Log in or join to comment